अभिनंदनचे पोस्टर दाखवून गळा कापण्याचे हावभाव   

पाकिस्तानी अधिकार्‍याची मग्रुरी; समाज माध्यमांवर संताप

लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये भारतीय आंदोलकांना खिजविण्यासाठी पाकिस्तानी अधिकार्‍याने कॅप्टन अभिनंदन याचे पोस्टर दाखवले आणि ’गळा कापण्याचे हावभाव’ केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. 
 
पहलगाम हल्ल्याचा निषेध निदर्शक शांततेत करत होते. तेव्हा पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी तैमूर राहत यांनी ’गळा कापण्याचे हावभाव’ करुन आगीत तेल ओतले. भारतीय वैमानिक कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचे पोस्टर दाखवत आंदोलकांची खिल्ली उडविली. असे करुन त्याने २६ पर्यटकांच्या हत्येचा निषेध करणार्‍या भारतीयांची थट्टा केली. दरम्यान, २०१९ मध्ये व्याप्त काश्मीरमधील एका गावात लढाऊ विमान कोसळल्यानंतर अभिनंदनला पाकिस्तानी लष्कराने पकडले होते. नंतर त्यांची दोन दिवसांनी सुटका केली होती. दरम्यान, अधिकार्‍याच्या हावभावाचे  पडसाद समाज माध्यमांवर तातडीने उमटले. अनेकांनी या कृतीचा निषेध केला.’मनोरुग्ण’, ’घृणास्पद’ हावभाव असे वर्णन त्यांनी केले.’पाकिस्तानच्या लष्करी अधिकारी आणि मुत्सद्दी कर्मचार्‍यांमध्ये सौजन्याच्या अभावाचे हे लक्षण आहे,’ अशा शब्दांत टिकेची झोड उठविली.  
 
आधी तुमची मान वाचवा
 
दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग यांनी पाकिस्तानला आधी तुमची मान वाचवा,  असा इशारा दिला. ते म्हणाले, पाकिस्तान आणखी काय करू शकतो?. पाकिस्तानच्या डोक्यावर कयामत येत आहे. तरीही तुम्ही निरपराध नागरिकांना शिरच्छेद करण्याच्या धमक्या देत आहात. धमकावणार्‍यांची ओळख लवकरच पटविली जाईल, तुम्हाला आता ब्रिटनमध्ये जाब विचारला जाईल. काळजी घ्या. 

Related Articles